Bye-law 38Ch.3 · सदस्यत्व
संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांचे हस्तांतरण
अधिकृत मजकूर
संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांचे हस्तांतरण करण्याबाबत नोटीस
38 (अ) एखाद्या सदस्यास संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील आपले भाग व हितसंबंध यांचे हस्तांतरण करावयाचे असल्यास त्याने सदर हस्तांतरणाचा आपला इरादा असल्याबद्दल विहित नमुन्यात 15 दिवसांची नोटीस संस्थेच्या सचिवास पाठवली पाहिजे व सदर नोटिशीसोबत ज्याचे नांव हस्तांतरण करावयासाठी योजिले आहे त्याची हस्तांतरणास संमती असल्याबद्दलचे विहित नमुन्यातील पत्र जोडले पाहिजे.
(ब) अशी नोटीस मिळाल्यानंतर, संस्थेच्या सचिव अधिनियमातील कलम 29 (2)(अ) आणि (ब) अनुसार सकृतदर्शनी सदर सदस्य संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील आपले भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यास पात्र आहे किंवा कसे हे नोटिशीवर नमूद करुन सदर नोटीस मिळाल्याच्या लगतनंतर भरणाऱ्या समितीच्या सभेपुढे ती ठेवील.
(क) संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासाठी अधिनियमाच्या कलम 29 (2) (अ) आणि (ब) मधील तरतुदींच्या अनुषंगाने सदस्य अपात्र ठरला तर समितीने या संबंधांत निर्णय घेतल्याच्या तारखेपासून 8 दिवसांच्या अवधीत संबंधित सदस्याला तसे कळविण्याबाबत समिती सचिवास निदेश देईल.
(ड) संस्थेचे भांडवलातील / मालमत्तेतील हस्तांतरकाचे भाग व हितसंबंध हस्तांतरितीकडे हस्तांतरित करण्यासाठी संस्थेच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही. तथापि , हस्तांतरकाला अथवा हस्तांतरितीला अशा प्रमाणपत्राची आवश्यकता भासल्यास ती तसा लेखी अर्ज संस्थेकडे करील आणि संस्थेची समिती अर्जाच्या योग्यतेनुसार विचार करुन योग्य तो निर्णय एक महिन्याचे आत घेईल.
(ई) हस्तांतरक / हस्तांतरिती खालील कागदपत्रे सादर करुन पुढीलप्रमाणे पूर्तता करील.
(एक) संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील त्यांचे भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज व सोबत भागपत्र सादर करणे;
(दोन) प्रस्तावित हस्तांतरितीच्या सदरस्यत्वासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे;
(तीन) सदस्याकडून/हस्तांतरकाकडून विहित नमुन्यातील राजीनामा सादर करणे;
(चार) चुकत्या केलेल्या मुद्रांक शुल्कासह नोंदणीकृत करारपत्र ;
(पाच) नियोजित हस्तांतरणासाठी संयुक्तिक कारणे देणे;
(सहा) हस्तांतरकाद्वारे संस्थेची सर्व दायित्वे चुकती करणेबाबत हमीपत्र;
(सात) हस्तांतरण फी म्हणून रुपये 500 एवढी रक्कम प्रदान करणे;
(आठ) प्रस्तावित हस्तांतरितीने देय असलेली रुपये 100/- इतकी प्रवेश फी भरणे;
(नऊ) आपल्या भूभागांच्या हस्तांतरणाबद्दल सर्वसाधारण सभेने ठरविलेल्या दराने अधिमूल्य भरणे. मात्र हे अधिमूल्य सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य शासन यांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या परिपत्रकामध्ये विहित केलेल्या मर्यादेमध्येच असले पाहिजे. हस्तांतरकाकडून किंवा हस्तांतरितीकडून कोणताही इतर निधी याखाली देणगी किंवा अंशदान म्हणून अथवा अन्य कोणत्याही सबबीखाली कोणतीही जास्तीची रक्कम वसूल करता येणार नाही;
(दहा) त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीनुसार अगर शासनाच्या किंवा वित्तपुरवठा करणा-या संस्थेच्या किंवा कोणत्याही अन्य प्राधिकरणाच्या आदेशानुसार अगर मंजुरीनुसार लागणारे “ ना हरकत प्रमाणपत्र” सादर करणे;
(अकरा) त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींनुसार या उपविधीत विहित केलेल्या अशा नमुन्यामध्ये द्यावे लागणारे हमीपत्र / प्रतिज्ञापत्र सादर करणे;
टीप :- वरील अट क्र. 9 ही संस्थेच्या भांडवलामध्ये मालमत्तेतील सदस्याचे भाग व हितसंबंध, त्याच्या कुटुंबियाकडे किंवा त्याने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीकडे अथवा त्या सदस्याच्या कायदेशीर वारसच्या नावे करतांना अथवा सदस्यांमधील आपापसातील सदनिका बदलासाठी लागू असणार नाही.
Related Forms
संबंधित तरतुदी
← Previous
37. Payment of the value of Shares and interest of the deceased Member in the capital / property of the Society to the heir / legal Representative
Next →
39. Disposal of transfer applications
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.