Bye-law 47Ch.3 · सदस्यत्व
सचिवाकडून सदनिकेची पाहणी व दुरुस्तीबाबत अहवाल
अधिकृत मजकूर
सचिवाकडून सदनिकेची पाहणी व दुरुस्तीबाबत अहवाल.
47 (अ) समितीस उपविधी क्र. 156 अन्वये नमूद केलेली आपली कार्ये पार पाडता यावीत म्हणून संस्थेच्या प्रत्येक सदस्याने, सचिव व समितीपैकी कोणीही एक सदस्य यांना सदनिकेची स्थिती तपासून, त्यास काही दुरुस्तीची आवश्यकता आहे याची खात्री करुन घेण्यासाठी संबंधित सदस्यास पूर्व सूचना दिल्यास त्याने आपल्या सदनिकेत प्रवेश करु दिला पाहिजे. संस्थेचा सचिव समितीकडे या संबंधीचा आपला अहवाल सादर करील व त्यामध्ये कोणत्या दुरुस्त्या संस्थेने करावयास हव्यात व कोणत्या दुरुस्त्या सभासदाने स्वखर्चाने करावयास हव्यात याचा तपशील नमूद करील.
सदस्य त्याच्या सदनिकेत संस्थेच्या स्वखर्चाने करावयाच्या दुरुस्त्यासंबंधी नोटीस
(ब) अशाप्रकारे अहवाल प्राप्त झाल्यावर समिती, उपविधी क्र. 159 (अ) अन्वये तरतूद केल्याप्रमाणे संस्थेला स्वखर्चाने कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीचा खर्च किती त्याची खातरजमा करील व समिती, दुरुस्ती करण्यासंबंधी आपला इरादा असल्याबद्दल सदस्यास तिला योग्य वाटेल अशा मुदतीची नोटीस बजावण्याची व्यवस्था करील व त्यानंतर संबंधित सदस्य संस्थेकडून थेट किंवा वास्तुशास्त्रज्ञाकडून नेमण्यात आलेल्या कामगारांना दुरुस्तीचे काम पार पाडण्यासाठी सदनिकेत प्रवेश देईल. संबंधित सदस्याने जर वाजवी व पटतील अशी कारणे न देता आपल्या सदनिकेत प्रवेश करुन दिला नाही तर , संस्थेच्या सचिवास सदनिकेत प्रवेश करण्याचा व समितीने त्यासंबंधात प्राधिकृत केलेल्या सदस्याच्या किंवा संस्थेने नेमलेल्या वास्तुशास्त्रज्ञाच्या देखरेखी खाली काम पार पाडण्याचा अधिकार राहील.
सदस्याने स्वखर्चाने सदनिकेची करावयाची दुरुस्ती संबंधी सदस्यास नोटीस
(क) ज्या दुरुस्त्या सदस्याने स्वखर्चाने करावयाच्या आहेत त्यांच्या बाबतीत समिती सदस्याला त्याच्या सदनिकेत आवश्यक असलेल्या दुरुस्त्यांचा तपशील नमूद करुन एक नोटीस बजावण्याची व्यवस्था करील व संस्थेने नेमलेल्या वास्तुशास्त्रज्ञाचे कोणताही असल्यास समाधान होईल, अशा रीतीने सदनिकेच्या दुरुस्तीचे काम स्वखर्चाने समिती नेमून देईल त्या कालावधीत पूर्ण करण्याचे फर्मावील. नोटिशीत दिलेल्या बाबींची पूर्तता करण्यात सदस्याकडून कसूर झाल्यास सदस्याला योग्य ती नोटीस दिल्यानंतर त्या सदनिकेत प्रवेश करण्याच्या व दुरुस्तीचे काम पूर्ण करुन घेण्याचा अधिकार संस्थेच्या सचिवास अगर संस्थेने नेमलेल्या वास्तुशास्त्रज्ञास राहील. संस्थेने अशा दुरुस्तीवर खर्च केलेली रक्कम संबंधित सदस्याकडून वसुलीयोग्य असेल.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.