← Bye-Laws/#3
EN
Bye-law 3Ch.1 · प्रारंभिक

शब्द व संज्ञांचा अर्थ लावणे

अधिकृत मजकूर
शब्द व संज्ञा याचा अर्थ लावणे 3. या उप-विधीमध्ये अन्यथा स्वतंत्रपणे तरतूद केली नसेल तर पुढील शब्दांना व संज्ञांना यात त्यांना जो अर्थ नेमून देण्यात आलेला आहे तो अर्थ असेल. (एक) "अधिनियम" याचा अर्थ, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960, असा आहे. (दोन) "उपविधी" याचा अर्थ, अधिनियमाशी सुसंगत असलेले आणि, त्यावेळी अंमलात असलेल्या अधिनियमान्वये नोंदलेले आणि तीत अशा उपविधीच्या नोंदलेल्या सुधारणांचा समावेश होतो. (तीन) "मुख्य प्रवर्तक" याचा अर्थ, प्रवर्तकांनी त्यांच्या पहिल्या बैठकीमध्ये किंवा मुख्य प्रवर्तकाचे पद रिक्त राहिले असेल त्याबाबतीत त्यानंतरच्या बैठकीमध्ये पहिली सर्वसाधारण सभा होईपर्यंत जिला निवडून दिलेले असेल ती व्यक्ती, असा आहे. (चार) "समिती" याचा अर्थ या अधिनियमाच्या कलम 73 अन्वये संस्थेच्या कामकाजाची व्यवस्था ज्या व्यवस्थापन समितीकडे किंवा संचालक मंडळाकडे किंवा नियामक संस्थेकडे किंवा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इतर निदेशक संस्थेकडे — मग ती कोणत्याही नावाने संबोधण्यात आलेली असो — सोपविण्यात आली आहे व निहित करण्यात आली आहे ती समिती, असा आहे. (पांच) "पूर्ण दिवसांची नोटीस" याचा अर्थ, नोटीस पाठवल्याचा दिनांक व ज्या दिवशी सभा बोलविली आहे तो दिनांक या दोन दिवसांदरम्यानचे एकूण कॅलेंडर दिवस, असा आहे. (सहा) "सदनिका" याचा अर्थ, निवासासाठी किंवा कार्यालयासाठी, किंवा शोरुमसाठी किंवा दुकानासाठी किंवा गोदामासाठी वापरलेली अगर वापरावयाचा इरादा असलेली अशी स्वतंत्र व स्वयंपूर्ण एकत्रित जागा, असा आहे, आणि या संज्ञेत गॅरेज, किंवा दवाखाना, किंवा सल्ला केंद्र (कन्सल्टिंग रुम), किंवा रुग्ण-चिकित्सालय, किंवा पिठाची गिरणी, किंवा कोचिंग क्लासेस, किंवा पाळणाघर किंवा ब्यूटिपार्लर यासाठी वापरावयाच्या इमारतीचा भाग असलेल्या अन्य जागेचा व अपार्टमेंटचाही (वेश्म) समावेश होतो. (सात) "गृहनिर्माण संस्था संघ" याचा अर्थ, अधिनियमान्वये नोंदणीकृत व अधिसूचित केलेला गृहनिर्माण सहकारी संस्थांचा संघ, असा आहे. (आठ) "मालकी हक्काच्या सदनिकाबाबत अधिनियम" याचा अर्थ, महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत (त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्याची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत) अधिनियम, 1963, असा आहे. (नऊ) "कागदपत्र" याचा अर्थ, उपविधी क्र. 142 आणि 143 मध्ये उल्लेखिलेल्या सर्व बाबी किंवा त्यापैकी कोणतीही बाब, असा आहे. (दहा) "वाहने उभी करण्याची जागा" याचा अर्थ, संस्थेने तिच्या आवारात वाहने उभी करण्यासाठी राखून ठेवलेली मोकळी जागा, असा आहे आणि त्यामध्ये स्टिल्ट, तळमजला, पोडिअम व यांत्रिकी वाहनतळाचा समावेश होतो. (अ) वाहनतळ भाग (स्लॉट) याचा अर्थ, संस्थेच्या उपलब्ध वाहने उभी करण्याच्या जागेमध्ये एक वाहन उभे करण्यासाठी (हलके चार चाकी मोटार वाहन किंवा दुचाकी) सीमांकित केलेले व क्रमांक टाकलेले वैयक्तिक वाहनतळ भाग, असा आहे. (अकरा) "विहित नमुना" याचा अर्थ, नमुना ज्या उप-विधी क्रमांकाखाली विहित करण्यात आला आहे तो क्रमांक आणि ज्या परिशिष्टाला जोडण्यात आला आहे ते परिशिष्ट दर्शविणारा जोडपत्र दोन मध्ये अंतर्भूत केलेला नमुना, असा आहे. (बारा) "प्रवर्तक" याचा अर्थ, ज्या "व्यक्तीने" संस्थेच्या नोंदणीसाठी करावयाच्या अर्जावर सही केली आहे ती व्यक्ती, असा आहे. (तेरा) "प्रवर्तक बांधकाम व्यवसायी" याचा अर्थ, अशी व्यक्ती ज्यामध्ये भागीदारी संस्था किंवा निकाय किंवा व्यक्तीचा संघ याचा समावेश होतो (नोंदणीकृत आहे किंवा नाही किंवा कसे) जी सर्व किंवा त्यापैकी कांही वेश्मिका किंवा सदनिका (किंवा वेश्म) इतर व्यक्तींना किंवा कंपनीला, किंवा सहकारी संस्थेला, किंवा व्यक्तीच्या संघाला विक्री करण्याच्या प्रयोजनासाठी बांधतो किंवा बांधवून घेण्याची व्यवस्था करतो ती व्यक्ती, असा आहे आणि तीत तिच्या अभिहस्तांकितीचा समावेश होतो; आणि ज्या ठिकाणी बांधकाम करणारी व्यक्ती व विक्री करणारी व्यक्ती या भिन्न व्यक्ती असल्या तरी त्या दोहोंचाही या संज्ञेत समावेश होतो. (चौदा) "नियम" याचा अर्थ, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961, असा आहे. (पंधरा) "राखीव निधी" याचा अर्थ, अधिनियमाच्या कलम 66(1) व उपविधी क्रमांक 12(अ) नुसार उभारलेला निधी, असा आहे. (सोळा) "दुरुस्ती व देखभाल निधी" याचा अर्थ, उपविधी क्र. 13 (अ) नुसार उभारलेला निधी, असा आहे. (सतरा) "कर्ज निवारण निधी" (सिंकिंग फंड) याचा अर्थ, उपविधी क्र. 13(क) नुसार उभारलेला निधी, असा आहे. (अठरा) "प्रमुख दुरुस्ती निधी" (Major Repairs Fund) याचा अर्थ, प्लॅस्टरिंग, आवार भिंत बांधणे, फरशीकाम, संपूर्ण रंगकाम आणि पुनर्बांधकामांसह मोठी बांधकामे करण्यासाठी संस्थेने उभारलेला आणि उपविधी क्र. 13 (ब) खाली प्रस्थापित केलेला निधी, असा आहे. (एकोणीस) "नगरपालिका अधिनियम" याचा अर्थ, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 (1965 चा 40), असा आहे. (वीस) "मोकळी जागा" याचा अर्थ, जागेचे भूखंडांतर्गत भाग असलेले खुले क्षेत्र, असा आहे. (एकवीस) "खुली गच्ची" याचा अर्थ, जी गच्ची अन्यथा कोणत्याही सदस्याच्या केवळ मालकीची नाही ती गच्ची, असा आहे. (बावीस) "सामाईक क्षेत्रे आणि सुविधा" याचा अर्थ, (अ) इमारत ज्या जागी उभी आहे ती जागा. (ब) इमारतीचा पाया, खांब, मुख्य मधली तुळई, बीम्स, सपोर्टर्स, मुख्य भिंती, छप्पर, हॉल कॉरिडोर, लॉबीज, जिना, जिन्याचा मार्ग, उद्वाहने / सरकते जीने, आगीच्या वेळी बाहेर जाण्याचा तातडीचा मार्ग, प्रवेशद्वार, बाहेर जाण्याचा मार्ग इ. भाग. (क) तळघर, सेलर्स, भुईघर, आवार, बाग, सीमांकित वाहने उभी करण्याचे भाग नसतील तर वाहनतळ क्षेत्र आणि सामान ठेवण्याची जागा. (ड) मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी नेमलेल्या पहारेकऱ्यासाठी किंवा रखवालदारासाठी सामान ठेवण्याची उपलब्ध करुन देण्यांत आलेली संस्थेच्या मालकीची जागा. (ई) विद्युत पुरवठा, प्रकाश, गॅस, पाण्याची टाकी व पाणी तापवणे, पाणी साठवणूक व पंप हाऊस, रेफ्रिजरेशन, वातानुकूलन व जनरेटर्स, छतावर बसविलेली सौर उपकरणे व सामाईक मनोरे आणि सामाईक संसूचना व विभाजन योग्य उपकरणे अशा केंद्रीभूत सेवा उभारणे. (फ) सामाईक वापरासाठी असलेली उदवाहक, टाकी, पाईप, मोटर्स, पंखे, कंप्रेसर्स, जलवाहिन्या. (ग) तरतूद केली असेल त्याप्रमाणे आणि सर्वसाधारणपणे सर्व उपकरणे व ती बसवणे, सामाईक आणि व्यापारी तत्वावरील सुविधा. (ह) मालमत्तेचे अस्तित्व तसेच देखभाल व संरक्षण किंवा सामान्यत: सामाईक वापरासाठी आवश्यक किंवा सोयीचे त्या मालमत्तेचे इतर सर्व भाग. (तेवीस) "संस्था" याचा अर्थ, या अधिनियमाखाली नोंदणी केलेली ________________________ "सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित", असा आहे. (चोवीस) "सदस्य" या संज्ञेचा अर्थ, ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आली आहे त्या सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सहभागी असलेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सदस्य म्हणून यथोचितरीत्या दाखल करुन घेतलेली व्यक्ती आणि जिने मालमत्तेचे हक्क, मालकी हक्क व हितसंबंध व्यक्तिश: किंवा संयुक्तरीत्या धारण केले आहेत ती व्यक्ती, असा आहे. (चोवीस) (अ) "क्रियाशील सभासद" याचा अर्थ, (एक) ज्या व्यक्तीने संस्थेमध्ये सदनिका / युनिट खरेदी केले आहे आणि त्याच्या ती मालकीची आहे अशी व्यक्ती, (दोन) जी व्यक्ती अगोदरच्या पाच लागोपाठच्या वर्षांतील संस्थेच्या किमान एकातरी वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहीली आहे, ती व्यक्ती. परंतु ज्या सदस्यांची अनुपस्थिती संस्थेच्या सर्वसाधारण सभेद्वारे क्षमापित करण्यात आली अशा सदस्यांना या खंडातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही. (तीन) ज्या व्यक्तीने लागोपाठच्या पांच वर्षांच्या कालावधीत सोसायटीच्या किमान एका वर्षाच्या देखभालीची आणि सेवाशुल्काची रक्कम भरलेली आहे, ती व्यक्ती, (ब) "सहयोगी सभासद" (Associate Member) याचा अर्थ, जो सदस्य इतर सदस्याबरोबर व्यक्तिश: किंवा संयुक्तपणे मालमत्तेमध्ये हक्क, मालकी हक्क व हितसंबंध धारण करतो पण ज्याचे नांव भागप्रमाणपत्रात प्रथम स्थानी येत नसेल असा सदस्य, असा आहे. (क) "नाममात्र सभासद" याचा अर्थ, नोंदणी झाल्यावर अशा सदस्यत्वासाठी व्यक्तिश: किंवा संयुक्तपणे दाखल केलेल्या मालमत्तेमध्ये हक्क, मालकी हक्क व हितसंबंध धारण करीत नाही अशी व्यक्ती, असा आहे. (पंचवीस) "कुटुंब" याचा अर्थ, ज्यामध्ये पती, पत्नी, आई, वडील, भाऊ, बहिण, मुलगा, मुलगी, जावई, मेहुणा (बायकोचा भाऊ), मेहुणी (पत्नीची बहीण), सून, नातू, नात, बहीणीचा पती, यांचा समावेश होतो, अशा व्यक्तींचा समूह, असा आहे. (सव्वीस) "हस्तांतरण फी" (ट्रान्सफर फी) याचा अर्थ, उपविधी क्र. 38(ई)(7) अन्वये तरतूद केल्याप्रमाणे भोगवटयाच्या हक्कासह आपले भागपत्र (शेअर्स) हस्तांतरकाने हस्तांतरित करण्यासाठी त्याच्याकडून संस्थेला देय असलेली रक्कम, असा आहे. (सत्तावीस) "अधिमूल्य" (Premium) याचा अर्थ, सदस्याने आपली भागपत्रे व संस्थेच्या भांडवली मालमत्तेतील आपला हितसंबंध हस्तांतरित करते वेळी, संस्थेस उपविधी क्र. 38(ई) 9 अन्वये तरतूद केल्याप्रमाणे हस्तांतरण फी व्यतिरिक्त देय असलेली रक्कम, असा आहे. (अठ्ठावीस) "खेळते भांडवल" (वर्किंग कॅपिटल) याचा अर्थ, भरणा केलेले भांडवल, भाग भांडवल, नफ्यातून उभारलेला निधी आणि कर्ज काढून व इतर मार्गांनी उभा केलेला पैसा यांसह संस्थेकडे असलेला निधी, असा आहे. (एकोणतीस) "प्राधिकृत व्यक्ती" याचा अर्थ, अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाहीसाठी रीतसर प्राधिकृत केलेली व्यक्ती, असा आहे. (तीस) "राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण" याचा अर्थ, मतदार याद्या तयार करण्यावर अधीक्षण, निदेशन आणि नियंत्रण करण्यासाठी तसेच अधिसूचित करण्यात येईल त्याप्रमाणे संस्थेची किंवा संस्थांच्या वर्गाच्या समितीची निवडणूक घेण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेले किंवा नामनिर्देशित केलेले प्राधिकरण, असा आहे. (एकतीस) "तज्ञ संचालक" याचा अर्थ, गृहनिर्माण क्षेत्रातील अनुभव असलेली व संस्थेच्या उद्देशाशी व कार्याशी निगडित क्षेत्रातील व्यक्ती, असा आहे. (बतीस) "कार्यलक्षी संचालक" याचा अर्थ, समितीने नाम निर्देशित केलेला मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा व्यवस्थापक किंवा कोणत्याही पदनामाने संबोधित करण्यात आलेली व्यक्ती आणि जी समितीने सोपविलेले कर्तव्य व कार्य पार पाडत आहे अशी व्यक्ती, असा आहे. (तेहतीस) "अधिकारी" याचा अर्थ, अशा संस्थेच्या कोणत्याही पदावर निवडून दिलेली किंवा नियुक्त केलेली व्यक्ती, असा आहे आणि तीत सभापती, उप-सभापती, अध्यक्ष, सचिव, सह सचिव, कोषाध्यक्ष, उप कोषाध्यक्ष, संस्थेने निवडलेली अथवा नियुक्त केलेली व्यक्ती आणि त्यामध्ये चेअरमन, व्यवस्थापक, व्यवस्थापन समिती सदस्य, आणि अशा संस्थेच्या कामकाजासंबंधी निदेश देण्यासाठी कोणतीही निवडून दिलेली अथवा नियुक्त केलेली इतर कोणतीही व्यक्ती यांचा समावेश होतो.

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.